जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. मात्र अजूनही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या महिन्यात अर्थातच जून महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. जूनमध्ये राज्यातील कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला मात्र उर्वरित ठिकाणी पावसाची तीव्रता खूपच कमी होती.
दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात तर मोसमी पावसाची सक्रियता फारच कमी झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळाली. यामुळे यंदाही गेल्या वर्षाप्रमाणेच मौसमी पाऊस शेतकऱ्यांसोबत दगाफटका करणारा असे वाटत होते.
परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये तीव्र पाऊस झाला. पावसाची तीव्रता काही भागात एवढी अधिक होती की अक्षरशः ढगफुटी सारखा आणि अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. मात्र, यातूनही राज्यातील काही जिल्हे कोरडेच राहिले हे मात्र विशेष. त्यामुळे पावसाचा हा लपंडाव कधी संपणार आणि सर्वदूर जोरदार पाऊस कधी होणार हाच मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय.
अशातच, आता भारतीय हवामान खात्याने आगामी पाच दिवसाच्या हवामानासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकण विभागात, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरावर आणि विदर्भातील काही भागात पावसाचा जोर हा उर्वरित राज्याच्या तुलनेत अधिक पाहायला मिळतं आहे.
दरम्यान हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. आजपासून अर्थातच 17 जुलै पासून पुढील पाच दिवस म्हणजेच 21 जुलै पर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे.
या कालावधीत राजधानी मुंबईसह संपूर्ण कोकण, नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती वर्धा यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला या 11 जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच खानदेशातील सर्वच्या सर्व 3 जिल्ह्यांमध्ये, अहमदनगर नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम पाऊस बरसणार असा अंदाज खुळे यांनी यावेळी दिला आहे.