Panjabrao Dakh Havaman Andaj : मागच्या दहा-बारा दिवसात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला आहे. जवळपास गेल्या एका पंधरवड्यापासून राज्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. पावसाने महाराष्ट्राला अक्षरशा झोडपून काढले आहे. मुंबई आणि पुण्यात पावसाचे विक्राळ स्वरूप पाहायला मिळाले. एकीकडे मुंबईची तुंबई झाली होती तर पुण्यातही पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली.
राज्यात ठीक-ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. मुंबई, पुण्यासारखीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरातही पाहायला मिळाली. विदर्भातही पावसाचा जोर काहीसा असाच होता. विदर्भातील गडचिरोलीमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळाला.
अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस मराठवाड्यात फक्त पावसाची भूर भूर पहायला मिळणार आहे. म्हणजेच मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.
तथापि राज्यात पाच ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. या काळात राज्यात दररोज भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात रिमझिम, काही भागात मुसळधार तर कुठे अतिवृष्टी होणार असा अंदाज पंजाबरावांनी यावेळी जारी केला आहे.
या कालावधीत राज्यातील कोकण, पूर्व आणि पश्चिम विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहण्याची शक्यता आहे.
एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मुंबई आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये पाच ऑगस्ट 2024 पर्यंत पंजाबरावांनी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तथापि या भागात या सदर कालावधीमध्ये रोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. पंजाबरावांप्रमाणेच भारतीय हवामान खात्यातील काही तज्ञांनी देखील राज्यात तीन ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे खानदेश वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्रमध्ये आज पासून दोन दिवस म्हणजेच 31 जुलै पर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या भागात मात्र एक ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार आहे.
तसेच मराठवाडा विभागात तीन ऑगस्टपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच धुळे, जळगाव, नंदुरबार या खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
कोकणात मात्र अति जोरदार पाऊस पडणार आहे. कोकणातील सर्वच्या सर्व सात जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्टपर्यंत अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असे मत हवामान खात्यातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.