Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने हवामानात बदल होत आहे. हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या राज्यात वादळी पावसाचे सत्र सुरू आहे. जवळपास 15 ते 16 दिवसांपासून वादळी पावसाचे हे सत्र सुरू असून रोज भाग बदलत कुठे ना कुठे पाऊस होत आहे.
विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून अवकाळी पावसाचे सत्र केव्हा थांबणार हाच मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
एकीकडे शेतकरी बांधव अवकाळी पाऊस थांबला पाहिजे म्हणून देवाकडे साकडे घालत आहे तर दुसरीकडे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे.
राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून, गेले काही दिवस राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस हजेरी लावतांना दिसत आहे. दुसरीकडे मुंबईसह कोकणात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उष्णतेची लाट येत आहे.
विशेष म्हणजे आगामी काही दिवस या परिसरात उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज आयएमडीने नुकताच दिला आहे. तथापि, आज अर्थातच 28 एप्रिल 2024 ला राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने आज बीड, धाराशीव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होणार असा अंदाज आहे.
यामुळे मराठवाडा आणि विदर्भ विभागातील या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे येथील नागरिकांनी खूपच आवश्यकता असेल तेव्हाच दुपारी घराबाहेर पडावे अन्यथा घरातच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे.